वयाच्या २१-२२ व्या वर्षी शिक्षण संपतं आणि आपण नोकरीला लागतो. सुरुवातीला पगार किती असतो? साधारण २० हजार. आपल्यासारख्या सामान्य घरातल्या मुलांकडे मागून आलेली काही मोठी संपत्ती नसते, त्यामुळे आपल्याला शून्यातूनच सगळं उभं करायचं असतं.
सामान्य मुलांचा संघर्ष आणि लग्नाचं टेन्शन
नोकरीत ३-४ वर्षे गेली की वय २६-२७ च्या आसपास येतं. मग घरातून आणि नातेवाईकांकडून लग्नासाठी प्रेशर सुरू होतो. पण वयाच्या २२ व्या वर्षी नोकरीला लागलेला मुलगा, अवघ्या ५-६ वर्षांत स्वतःचं घर आणि मोठी बचत कशी काय उभी करू शकतो? शक्यच नाही. मग इथूनच सुरू होतो एक मोठा गोंधळ – लग्न करायचंय, पण भविष्याचं काय आणि स्वतःचं घर घ्यायचं की भाड्याने राहायचं?
युट्यूबर्सचा सल्ला विरुद्ध आपली सुरक्षितता
आजकाल अनेक युट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्स तुम्हाला सांगतील की, “अरे, घर कशाला विकत घेताय? भाड्याने राहा आणि उरलेले पैसे म्युच्युअल फंडात (SIP) टाका.” ऐकायला हे खूप भारी वाटतं. पण वास्तवात काय होतं? समजा तुमचं लग्न झालंय, घरात आई-वडील, बायको आणि मुलं आहेत. तुम्ही भाड्याच्या घरात आहात आणि अचानक घरमालक येऊन म्हणाला, “पुढच्या महिन्यात घर खाली करा.” अशा वेळी काय करणार?
म्हणूनच आपल्याकडे स्वतःचं घर असणं ही फक्त एक हौस नाही, तर ती कुटुंबाची ‘सिक्युरिटी’ म्हणजेच सुरक्षितता मानली जाते. घर कधीही घ्या, पण हक्काचं घर असणं माणसाला मानसिक शांती देतं.
कागदावरचं गणित: होम लोन (EMI) विरुद्ध SIP
आता आपण कागदावरचं खरं गणित पाहूया. समजा, विरारसारख्या शहरात तुम्ही ३० लाखांचं घर घ्यायचं ठरवलं.
१. स्वतःचं घर आणि होम लोनचं गणित:
- तुम्हाला २५ लाखांचं कर्ज घ्यावं लागेल. (२० वर्षांसाठी)
- तुमचा महिन्याचा हप्ता (EMI) येईल साधारण २०,९११ रुपये.
- या २० वर्षांत तुम्ही बँकेला २५ लाख मुद्दल भराल, पण त्यासोबत तब्बल २५,१८,६४० रुपये फक्त व्याज द्याल!
- म्हणजे बँकेला तुम्ही एकूण ५०,१८,६४० रुपये परत कराल. थोडक्यात सांगायचं तर, तुम्ही घराच्या किमतीएवढंच बँकेला व्याज देताय. यामुळे अनेक जण म्हणतात की एवढं व्याज देण्यापेक्षा भाड्याने राहिलेलं परवडलं.
२. भाड्याचं घर आणि SIP चं गणित:
आता लोक म्हणतात त्याप्रमाणे, विरारमध्ये १०,००० रुपये देऊन भाड्याने राहा आणि उरलेले १०,००० रुपये दर महिन्याला म्युच्युअल फंडात (SIP) गुंतवा.
- तुम्ही २० वर्षांत एकूण २४,००,००० रुपये गुंतवाल. (दरमहा १० हजारांप्रमाणे)
- समजा त्यावर १२% व्याज मिळालं, तर तुमचा मिळणारा नफा असेल ६७,९८,५७४ रुपये.
- म्हणजे २० वर्षांनंतर तुमच्या हातात एकूण ९१,९८,५७४ रुपये (जवळपास ९२ लाख!) असतील.
कागदावरचं गणित विरुद्ध वास्तव
हे गणित पाहिल्यावर कोणालाही वाटेल की भाड्याने राहणंच १००% शहाणपणाचं आहे. पण थांबा! हे फक्त कागदावर छान दिसतं. वास्तवात एका सामान्य कुटुंबाला २० वर्षं सतत घरे बदलत राहणं खूप त्रासाचं असतं.
आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘शिस्त’. २० वर्षं न चुकता SIP चालू ठेवणं हे फारच कमी लोकांना जमतं. घरात एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा अचानक मोठा खर्च आला, की लोक सगळ्यात आधी आपली SIP बंद करतात आणि पैसे काढून घेतात. तिथेच तुमचं ९२ लाखांचं स्वप्न मोडतं.
याउलट होम लोनचं तसं नसतं. बँकेचा हप्ता (EMI) बाऊन्स झाला तर मोठी पेनल्टी लागते, त्यामुळे माणूस पोटाला चिमटा काढून का होईना, पण EMI वेळेवर भरतो. हे कर्जच तुम्हाला नकळत एक आर्थिक शिस्त लावतं.
थोडक्यात सांगायचं तर…
माझं स्पष्ट मत असं आहे की, जर तुम्ही कुटुंबासोबत स्वतः राहायला घर घेत असाल आणि तिथे तुमच्या आयुष्यातल्या सुंदर आठवणी बनणार असतील, तर एकदा होम लोन घेणं कधीही चांगलं. कामावरून थकून घरी आल्यावर आपल्या स्वतःच्या घरात जी शांतता मिळते, ती त्या ९२ लाखांपेक्षाही खूप मोठी असते.
फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा – घर घेताना ते तुमच्या बजेटमध्येच घ्या आणि सुरुवातीला EMI शक्य तितका कमी कसा राहील हे पाहा. जसजसा तुमचा पगार वाढेल, तसतसं तुम्ही अतिरिक्त इन्कम (Extra income) कमवून कर्ज लवकर फेडू शकता.
एक नम्र विनंती: इथली माहिती फक्त तुम्हाला गोष्टी समजावून सांगण्यासाठी लिहिली आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात पैसे गुंतवणे हे रिस्कचे काम असते. त्यामुळे कुठेही पैसे टाकण्याआधी आपल्या फायनान्शिअल अॅडव्हायझरला नक्की विचारा आणि स्वतः पूर्ण खात्री करूनच निर्णय घ्या.