Mutual Fund SWP vs IDCW: काल तुमच्याही एका मित्राने म्युच्युअल फंडबद्दल (Mutual Fund) एक इन्स्टाग्राम रील शेअर केली असेल, ज्यामध्ये एक इन्फ्लुएन्सर SWP आणि IDCW बद्दल बोलत होता. त्या इन्फ्लुएन्सरचा दावा होता की SWP मध्ये तुम्हाला टॅक्स (Tax) भरावा लागतो, त्यामुळे IDCW हा पर्याय चांगला आहे. पण हे पूर्णपणे खरं आहे का? जर तुम्हाला म्युच्युअल फंडमधून दर महिन्याला नियमित उत्पन्न (Regular Income) हवे असेल, तर या दोन्हीपैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे, हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.

SWP म्हणजे काय?

SWP चा फूल फॉर्म सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (Systematic Withdrawal Plan) असा आहे. यामध्ये तुम्ही स्वतः ठरवता की तुम्हाला दर महिन्याला किती रक्कम आणि कोणत्या तारखेला हवी आहे. तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून ती ठराविक रक्कम दर महिन्याला आपोआप तुमच्या बँक खात्यात जमा होते. बाजाराची स्थिती कशीही असली तरी तुम्ही ठरवलेली रक्कम तुम्हाला मिळतेच. त्यामुळे ज्यांना पगार किंवा पेन्शनसारखे फिक्स उत्पन्न हवे आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

IDCW म्हणजे काय?

IDCW चा फूल फॉर्म Income Distribution cum Capital Withdrawal असा आहे. IDCW ला सोप्या भाषेत पूर्वी ‘डिव्हिडंड प्लॅन’ (Dividend Option) म्हटले जायचे. यामध्ये म्युच्युअल फंड कंपनीला जेव्हा चांगला नफा होतो, तेव्हा ते तो नफा गुंतवणूकदारांना वाटतात. पण, यामध्ये एक मोठी अडचण आहे. कंपनी कधी आणि किती पैसे देईल हे आधीच ठरलेले नसते. कंपनीला फायदा झाला नाही तर तुम्हाला त्या महिन्यात पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे जर तुम्ही घरखर्चासाठी या पैशांवर अवलंबून असाल, तर IDCW चा पर्याय अजिबात खात्रीशीर नाही.

हेही वाचा | Direct Vs Regular Plan: डायरेक्ट की रेग्युलर म्युच्युअल फंड? तुमच्या गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय कोणता?

SWP आणि IDCW मध्ये टॅक्सचा (Tax) काय नियम आहे?

सोशल मीडियावर अनेकदा अर्धीच माहिती दिली जाते. टॅक्स वाचवण्याच्या नादात तुमचे नुकसान होऊ नये, यासाठी टॅक्सचे हे नियम समजून घ्या.

SWP वरील टॅक्सची पद्धत


समजा, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आणि पुढील महिन्यापासून दरमहा ₹१०,००० ची SWP (Systematic Withdrawal Plan) सुरू केली. म्हणजेच, एका वर्षात तुम्ही एकूण ₹१,२०,००० काढाल. आता, जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमधून १२ महिन्यांच्या आत युनिट्सची विक्री करून पैसे काढले, तर सध्याच्या नियमानुसार त्यावर २०% Short-Term Capital Gains (STCG) Tax लागू होतो. मात्र, हा टॅक्स तुम्ही काढलेल्या संपूर्ण ₹१,२०,००० रकमेवर आकारला जात नाही, तर त्या रकमेमध्ये समाविष्ट असलेल्या नफ्याच्या भागावरच आकारला जातो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही वर्षभरात काढलेल्या ₹१,२०,००० पैकी ₹२०,००० हा नफा आहे, तर तुम्हाला केवळ त्या ₹२०,००० वर २०% दराने म्हणजेच ₹४,००० टॅक्स भरावा लागेल.

IDCW वरील टॅक्सची पद्धत

IDCW मध्ये मिळणारा डिव्हिडंड हा तुमच्या वार्षिक उत्पन्नात (Annual Income) जोडला जातो. त्यानंतर तुम्ही ज्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये (Income Tax Slab) येता, त्यानुसार तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. म्हणजेच, जर तुमचे उत्पन्न जास्त असेल आणि तुम्ही ३०% टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल, तर तुम्हाला मिळणाऱ्या IDCW च्या पैशांवरही ३०% टॅक्स लागेल, जो SWP च्या टॅक्सपेक्षा खूप जास्त असू शकतो.

new tax regime in marathi

तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे?

तुमची गरज काय आहे, यावर कोणता पर्याय निवडायचा हे अवलंबून असते:

  • नियमित उत्पन्नासाठी (Regular Income): जर तुम्हाला दर महिन्याला घरखर्चासाठी खात्रीशीर पैसे हवे असतील, तर SWP हाच सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये रक्कम आणि तारीख दोन्ही फिक्स असते.
  • टॅक्स वाचवण्यासाठी (Tax Saving): जर तुमचे एकूण उत्पन्न टॅक्स स्लॅबच्या खाली असेल (ज्यामुळे तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही) आणि तुम्हाला दर महिन्याला पैशांची अत्यंत गरज नसेल, तरच तुम्ही IDCW चा विचार करू शकता.

निष्कर्ष

इन्फ्लुएन्सरच्या दाव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. SWP मध्ये तुम्हाला टॅक्स भरावा लागतो हे खरे असले तरी, ते तुम्हाला आर्थिक सुरक्षितता आणि नियमित उत्पन्नाची खात्री देते. IDCW मध्ये पैसे कधी आणि किती मिळतील याचा काहीच भरवसा नसतो. त्यामुळे जर तुम्हाला दरमहा फिक्स इनकम हवे असेल, तर SWP चीच निवड करा.