Quick Overview: शेअर बाजार घसरताना तुमची SIP थांबवणे ही सर्वात मोठी आर्थिक चूक ठरू शकते. शेअर बाजार घसरताना म्युच्युअल फंडाची NAV कमी झाल्यामुळे तुमच्या त्याच पैशात जास्त ‘युनिट्स’ खरेदी होतात. याला Rupee Cost Averaging म्हणतात. जेव्हा बाजार पुन्हा उसळी घेतो, तेव्हा हेच जास्तीचे युनिट्स तुमच्या पोर्टफोलिओला मोठी गती देतात. त्यामुळे बाजारातील घसरण ही घाबरण्याची नाही, तर स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी असते.
तुम्ही आज सकाळी तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ चेक केलात आणि तिथे सर्वत्र ‘लाल रंग’ (Loss) दिसला? तोही थोडा नाही, तर चांगलाच मोठा लॉस दाखवत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच तुमच्या बँक खात्यातून SIP चे पैसे कट झालेत आणि आज फंडाची NAV (Net Asset Value) आणखी घसरली आहे. तुम्ही अनेक महिने किंवा वर्षांपासून अतिशय शिस्तीने गुंतवणूक करताय, पण रिटर्न मात्र काहीच दिसत नहींये.
अशा वेळी मनात एकच शंका येते – “बाजार खूप पडतोय, सध्या काही काळासाठी SIP पॉझ (Pause) करावी का?”
जर तुमच्या मनातही हा विचार आला असेल, तर काळजी करू नका; तुम्ही एकटे नाहीहात. मार्च २०२६ च्या AMFI (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया) च्या ताज्या आकडेवारीनुसार, तब्बल ५३.३८ लाख गुंतवणूकदारांनी आपल्या SIP बंद किंवा स्थगित केल्या. गेल्या ११ महिन्यांत पहिल्यांदाच नवीन SIPगु तवणूक सुरू करणाऱ्यांपेक्षा ती थांबवणाऱ्यांची संख्या वाढली.
पण इथेच एक मोठी गम्मत आहे. या ५३.३८ लाख लोकांनी नेमकी त्याच वेळी आपली गुंतवणूक थांबवली, जेव्हा त्यांचे कष्टाचे पैसे गेल्या एका वर्षातील सर्वात स्वस्त दरात म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करत होते! याउलट, याच महिन्यात देशात रेकॉर्डब्रेक ३२,०८७ कोटी रुपयांची SIP गुंतवणूक झाली. म्हणजेच, हुशार गुंतवणूकदारांनी या घसरणीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात युनिट्स जमा केले.
यामागील गणित अत्यंत साधे आहे. एकदा का हे लॉजिक तुम्हाला समजले, की बाजार घसरताना तुम्हाला भीती वाटण्याऐवजी आनंद होऊ लागेल!
समजून घ्या SIP चे खरे गणित (The Power of Unit Accumulation)
म्युच्युअल फंडमधील SIP ही एका साध्या सूत्रावर काम करते:
- बाजार तेजीत (NAV जास्त) = तुमच्या खात्यात कमी युनिट्स जमा होतात.
- बाजार मंदीत (NAV कमी) = तुमच्या खात्यात जास्त युनिट्स जमा होतात.
बाजार घसरतो म्हणजेच फंडाची NAV स्वस्त होते. याचा थेट अर्थ असा की, तुमच्या त्याच १०,००० रुपयांत तुम्हाला आधीपेक्षा जास्त युनिट्स लॉटरी लागल्यासारखे मिळतात.
हे आपण एका ६ महिन्यांच्या घसरत्या बाजाराच्या उदाहरणाने समजूया. समजा एका फंडाची NAV १०० रुपयांवरून ६५ रुपयांवर (३५% घसरण) आली आहे:
घसरत्या बाजारात ₹१०,००० च्या SIP चा प्रवास
| महिना | फंडाची NAV (₹) | मासिक गुंतवणूक (₹) | जमा झालेले युनिट्स |
| महिना १ | १०० | १०,००० | १००.०० |
| महिना २ | ९२ | १०,००० | १०८.७० |
| महिना ३ | ८३ | १०,००० | १२०.४८ |
| महिना ४ | ७५ | १०,००० | १३३.३३ |
| महिना ५ | ७० | १०,००० | १४२.८६ |
| महिना ६ | ६५ | १०,००० | १५३.८५ |
| एकूण | – | ६०,००० | ७५९.२२ |
या तक्त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते?
- तुम्ही ६ महिन्यांत एकूण ₹६०,००० गुंतवले आणि तुमच्याकडे ७५९.२२ युनिट्स जमा झाले.
- पहिल्या महिन्यात ₹१०० च्या NAV मुळे फक्त १०० युनिट्स मिळाले होते, पण ६ व्या महिन्यात ₹६५ च्या स्वस्त NAV मुळे थेट १५३.८५ युनिट्स मिळाले. म्हणजेच बाजार पडल्यामुळे तुम्हाला ५४ युनिट्स बोनस मिळाल्यासारखे जास्त मिळाले!
- यामुळे तुमची सरासरी खरेदी किंमत (Average Purchase Cost) प्रति युनिट फक्त ₹७९.०३ झाली ( Rs 60,000 / Rs 759.22).
जेव्हा मार्केट पुन्हा उसळी घेईल तेव्हा काय होईल?
आता संपत्ती निर्मितीची खरी जादू बघा! जेव्हा बाजार पुन्हा सुधारेल आणि फंडाची NAV मूळ पदावर म्हणजेच १०० रुपयांवर जाईल, तेव्हा तुमच्या ७५९.२२ युनिट्सचे एकूण मूल्य ₹७५,९२२ होईल. म्हणजे ₹६०,००० च्या गुंतवणुकीवर ₹१५,९२२ चा निव्वळ नफा (२६.५% परतावा)!
याउलट, जर एखाद्या व्यक्तीने पहिल्याच महिन्यात ₹६०,००० एकत्र (Lump sum) गुंतवले असते, तर त्याला फक्त ६०० युनिट्स मिळाले असते. जेव्हा NAV पुन्हा १०० वर येईल, तेव्हा त्याचे ₹६०,००० फक्त ₹६०,००० च राहतील (ना नफा, ना तोटा).
महत्त्वाची नोंद: गणितीय विश्लेषण स्पष्टपणे दाखवते की, घसरत्या बाजारात ठराविक अंतराने केलेली गुंतवणूक तुमची सरासरी खरेदी किंमत बाजाराच्या सरासरीपेक्षा कमी ठेवते. वरील उदाहरणात बाजाराची साधी सरासरी NAV ₹८०.८३ होती, पण SIP च्या रचनेमुळे तुमची खरेदी किंमत फक्त ₹७९.०३ झाली. यालाच Rupee Cost Averaging‘ म्हणतात.
पोर्टफोलिओ ‘लाल’ दिसणे म्हणजे गुंतवणूक अपयशी ठरणे नव्हे!
जेव्हा बाजार २०% पडतो, तेव्हा साहजिकच तुमच्या पोर्टफोलिओचे एकूण मूल्यही २०% कमी दिसते. हे अगदी सरळ गणित आहे, कारण युनिट्सची संख्या समान असली तरी गुणाकार करण्यासाठी असलेली NAV कमी झालेली असते.
पण अनेक गुंतवणूकदार इथेच भावनिक होऊन चूक करतात. पोर्टफोलिओ ‘रेड’ दिसला की त्यांना वाटते की त्यांची SIP फ्लॉप झाली. पण वास्तवात तसे नसते. पोर्टफोलिओचे मूल्य कमी होत असताना, तुमची SIP बॅकग्राउंडमध्ये जास्त वेगाने नवीन युनिट्सची बेरीज करत असते. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात: पोर्टफोलिओ व्हॅल्यू तात्पुरती घसरत असते (बॅड सिग्नल) आणि युनिट्स जमा होण्याचा वेग वाढत असतो (गुड सिग्नल). दुर्दैवाने, बहुतेक लोक फक्त पहिल्या सिग्नलकडे पाहतात.
इथे एक वास्तव लक्षात ठेवणे आवश्यक आहे: मंदीमध्ये स्वस्त युनिट्स जमा करण्याचा फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा बाजार भविष्यात पुन्हा वर येतो. भारतीय शेअर बाजाराचा ऐतिहासिक कल पाहिला तर, १९८० पासून आतापर्यंत कोणत्याही १० वर्षांच्या ‘रोलिंग पिरियड’मध्ये मार्केटने गुंतवणूकदारांना नेहमीच उत्तम पॉझिटिव्ह रिटर्न दिला आहे.
मंदीच्या मध्यभागी SIP थांबवल्यास होणारे मोठे नुकसान
समजा वरील उदाहरणातील एखाद्या गुंतवणूकदाराने घाबरून ३ऱ्या महिन्यात SIP थांबवली. त्याने काय केले? महाग घेतलेले युनिट्स तसेच राहिले, म्हणजेच झालेला तात्पुरता तोटा त्याने स्वीकारला. पण ४था, ५वा आणि ६वा महिना – जे खरेदीसाठी सर्वात स्वस्त आणि फायदेशीर होते, तिथल्या सुवर्णसंधीला तो मुकला. मंदीत बाहेर पडणे म्हणजे ‘तोटा पूर्ण अंगावर घेणे आणि भविष्यातील नफ्याचा त्याग करणे’ होय.
इतिहासाचा अभ्यास असे सांगतो की, जे गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेमुळे मंदीत SIP थांबवतात आणि बाजार वाढल्यावर पुन्हा सुरू करतात, त्यांना शिस्तीने गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा वार्षिक १ ते ३% कमी परतावा मिळतो. दिसायला ही टक्केवारी छोटी वाटेल, पण २०-३० वर्षांच्या दीर्घकाळात या ‘वर्तणूक दोषामुळे’ (Behavioral Drag) लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागते.
जर आपण भूतकाळातील आकडे पाहिले, तर १० वर्षांपूर्वी सुरू केलेली ₹१०,००० ची मासिक SIP (एकूण गुंतवणूक ₹१२ लाख) आजच्या घडीला जवळपास ₹२७.८ लाख झाली आहे. या अफाट संपत्ती निर्मितीमागील मुख्य कारण म्हणजे २०१६, २०२० (कोविड काळ) आणि २०२२ मधील बाजारातील मोठ्या घसरणी! त्या महिन्यांमध्ये पोर्टफोलिओ स्टेटमेंट्स अत्यंत वाईट दिसत होते, पण युनिट्स जमा होण्याचा वेग सर्वोच्च पातळीवर होता.
सद्यस्थितीत गुंतवणूकदारांनी करायच्या ३ महत्त्वाच्या गोष्टी
- १. पोर्टफोलिओ व्हॅल्यूऐवजी ‘युनिट काउंट’ ट्रॅक करा: तुमच्या म्युच्युअल फंड ॲपमध्ये लॉगिन करा आणि एकूण युनिट्सची संख्या नोंदवून ठेवा. मंदीच्या काळात ही संख्या दरमहा किती वेगाने वाढतेय हे पहा. हा वाढणारा आकडा म्हणजेच तुमची SIP अचूक काम करत असल्याचा पुरावा आहे.
- २. SIP ‘ऑटो-डेबिट’ मोडवर ठेवा: मॅन्युअली किंवा दरमहा स्वतःहून पैसे ट्रान्सफर करणे टाळा. ऑटो-डेबिटमुळे मार्केटमध्ये कितीही चढ-उतार असले तरी तुमची गुंतवणूक न चुकता होते. यामुळे बाजाराच्या भीतीपोटी चुकीचे निर्णय घेण्यापासून तुमचा बचाव होतो.
- ३. कंपाउंडिंगच्या दीर्घकालीन आलेखावर लक्ष केंद्रित करा: म्युच्युअल फंडमधील संपत्ती निर्मितीचा आलेख सरळ नसून वक्राकार असतो. २० वर्षांच्या SIP मधील शेवटची ५ वर्षे ही पहिल्या १५ वर्षांपेक्षा कैक पटीने जास्त संपत्ती निर्माण करून देतात. उदाहरणार्थ, ₹५,००० ची मासिक SIP १२% अपेक्षित परताव्याने:
- १० वर्षांत: सुमारे ₹११ लाख होते.
- २० वर्षांत: सुमारे ₹४५ लाख होते.
- ३० वर्षांत: तब्बल ₹१.५ कोटीच्या घरात पोहोचते!
जर तुम्ही केवळ मानसिक दडपणाखाली येऊन मंदीत चुकीचे निर्णय घेतले आणि दीर्घकालीन परताव्यात केवळ १% चा फरक पडला, तर ३० वर्षांनंतर तुमच्या हातात येणाऱ्या रकमेत ₹७० लाख कमी असतील!
निष्कर्ष
शेअर बाजारातील घसरण ही संपत्ती नष्ट करणारी नसून, ती दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एका मोठ्या ‘डिस्काउंट सेल’सारखी असते. मंदीच्या काळात तुमचे पैसे अधिक सक्षमपणे काम करतात. म्हणूनच, बाजाराचा आलेख खाली जात असताना शांत राहा, तुमची शिस्त मोडू देऊ नका आणि तुमची SIP अखंड चालू ठेवा!
महिना फक्त ₹२५० ची ‘Choti SIP’ तुम्हाला श्रीमंत बनवू शकते का?
FAQs
शेअर बाजार सातत्याने घसरत असताना मी माझी SIP तात्पुरती थांबवावी का?
अजिबात नाही. बाजार घसरत असताना फंडाची NAV कमी होते, ज्यामुळे तुमच्या त्याच मासिक हप्त्यात तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. अशा वेळी SIP थांबवल्यास तुम्ही स्वस्त दरात युनिट्स खरेदी करण्याची सर्वोत्तम संधी गमावून बसता.
‘रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग’ म्हणजे नक्की काय?
ही SIP ची एक अंगभूत रचना आहे. जेव्हा बाजार घसरतो तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात आणि बाजार वाढल्यावर कमी युनिट्स मिळतात. यामुळे दीर्घकाळात तुमच्या एकूण युनिट्सची खरेदी किंमत सरासरी पातळीवर (Average) येते, ज्याला रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग म्हणतात.
मंदीच्या काळात पोर्टफोलिओचे मूल्य कमी का दिसते?
पोर्टफोलिओचे मूल्य हे (एकूण युनिट्स × चालू NAV) अशा सूत्राने ठरते. मंदीत तात्पुरत्या स्वरूपात NAV कमी झाल्यामुळे मूल्य घटलेले दिसते. मात्र, यामुळे तुमच्या युनिट्सची संख्या कमी होत नाही, उलट ती वाढत असते.
मंदीमध्ये SIP थांबवून बाजार पुन्हा वाढू लागल्यावर सुरू केल्यास काय होते?
अशा रणनीतीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. अभ्यासानुसार, बाजाराची वेळ साधण्याच्या (Market Timing) नादात गुंतवणूकदार दीर्घकाळात १ ते ३% वार्षिक परतावा गमावतात, ज्यामुळे दीर्घकालीन संपत्ती लाखो रुपयांनी कमी होते.