Mutual Funds मध्ये लॉस! पैसे FD मध्ये ठेवले असते तर जास्त मिळाले असते, अनेक गुंतवणूकदारांची आजची भावना?

Mutual Fund Investment: सध्या अनेक गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न सुरू आहे — “शेअर बाजारात पैसे गुंतवून खरंच फायदा होतोय का?” काहींचे Mutual Funds अजूनही तोट्यात आहेत. काहींचा रिटर्न फक्त २% च्या आसपास आहे. त्यामुळे अनेकांना वाटत आहे की हेच पैसे बँकेच्या FD मध्ये ठेवले असते तर किमान ६.५ % तरी परतावा मिळाला असता. ही भावना पूर्णपणे स्वाभाविक आहे. कारण आपल्याला नफा दिसला की आनंद होतो, पण आपल्या पैशांची किंमत कमी झालेली पाहणं मनाला सहन होत नाही. परंतु इथे एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे.

FD vs Mutual fund in marathi

तुम्ही गुंतवणूक एका वर्षासाठी केली होती की लाँग टर्मसाठी? 

जर तुमचं उत्तर “लाँग टर्मसाठी” असेल, तर काही महिन्यांचा किंवा एका वर्षाचा निगेटिव्ह रिटर्न तुमच्या अंतिम संपत्तीचा निर्णय घेऊ शकत नाही. शेअर बाजार नेहमी सरळ रेषेत वर जात नाही. कधी युद्धाची चर्चा होते, कधी मंदीची भीती निर्माण होते, तर कधी बाजार पूर्णपणे नियंत्रित केल्यासारखा वाटतो. अशा वेळी भीतीचं वातावरण तयार होतं आणि अनेक गुंतवणूकदार घाबरतात. पण इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की चांगल्या कंपन्या आणि शेअर बाजाराने लाँग टर्म मध्ये संपत्ती निर्माण केली आहे.

एक साधं उदाहरण समजून घ्या

समजा तुमच्याकडे ₹५०,००० आहेत. आता तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे बँकेत FD करणे आणि दुसरा म्हणजे Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणे. जर तुम्ही हे पैसे बँकेत ६.५% व्याजदराने एका वर्षासाठी ठेवले, तर वर्षानंतर तुमची रक्कम साधारण ₹५३३०० होईल. सुरक्षित परतावा मिळेल आणि मनात कोणतीही चिंता राहणार नाही. आता दुसरीकडे, जर तुम्ही हेच ₹५०,००० इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवले, तर एका वर्षानंतर बाजारातील चढ-उतारामुळे तुमच्या गुंतवणुकीची किंमत कमी झाली असेल. पण खरी गोष्ट इथेच समजून घ्यायची आहे.

Mutual Funds मधील लॉस हा खरा लॉस नसतो, जोपर्यंत…

स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा — “मला हे पैसे आत्ताच लागणार आहेत का?” जर उत्तर “नाही” असेल, तर हा लॉस कायमस्वरूपी नाही. हा फक्त मोबाईल अँप मध्ये दिसणारा तात्पुरता लॉस आहे. कारण बाजार पुन्हा वाढला की तुमच्या गुंतवणुकीची किंमतही वाढू लागते. शेअर बाजारातील लॉस तेव्हाच कायमचा ठरतो जेव्हा आपण भीतीपोटी गुंतवणूक विकून टाकतो आणि पैसे बँक अकाउंटमध्ये घेतो.

बँक FD आणि Mutual Funds यांचा उद्देश वेगळा आहे

ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी अनेक लोक विसरतात. बँकेतील FD ही सुरक्षिततेसाठी असते. आपत्कालीन गरजा, स्थिरता आणि पैशांची सुरक्षितता यासाठी ती योग्य असते. तर Mutual Funds मधील गुंतवणूक ही संपत्ती वाढवण्यासाठी असते. महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळवण्यासाठी आणि लाँग टर्म मध्ये मोठी संपत्ती निर्माण करण्यासाठी इक्विटीचा वापर केला जातो. म्हणूनच दोन्ही गोष्टींची तुलना समान पातळीवर करता येत नाही.

खरी अडचण रिटर्नची नसते, मनाची असते

बहुतेक वेळा समस्या बाजारात नसते, तर आपल्या मनात असते. आपल्याला लाल रंगातील आकडे पाहण्याची सवय नसते. प्रॉफिट दिसला की आपण शांत असतो, पण थोडासा लॉस दिसला की लगेच घाबरायला होतं. म्हणून Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा — “उद्या बाजार आणखी खाली गेला तर मी मानसिकदृष्ट्या तयार आहे का?” जर उत्तर “हो” असेल, तरच इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी. कारण बाजारातील चढ-उतार ही त्याची कमतरता नाही, तर त्याचाच एक भाग आहे.

लाँग टर्म चित्र नेहमी मोठं असतं

एका वर्षात FD जास्त व्याज देऊ शकते. पण दहा, पंधरा किंवा वीस वर्षांच्या कालावधीत चांगल्या कंपन्या आणि Mutual Funds मधून मोठी संपत्ती निर्माण केली आहे. कारण काळानुसार कंपन्यांचा व्यवसाय वाढतो, प्रॉफिट वाढतो आणि देशाची अर्थव्यवस्था देखील वाढत जाते. बँक FD तुम्हाला ठरलेला रिटर्न देईल. पण इक्विटी तुम्हाला मोठी वाढ देण्याची क्षमता ठेवते.

शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा

आपण बँकेतील FD मधे पैसे ठेवतो सुरक्षिततेसाठी, तर शेअर बाजारात पैसे गुंतवतो वाढीसाठी. दोन्हींचं काम वेगळं आहे आणि दोन्ही आपल्या आर्थिक आयुष्यात महत्त्वाचे आहेत. म्हणून बाजार काही काळ खाली गेला म्हणून घाबरू नका. जर तुमच्याकडे संयम, दीर्घकालीन दृष्टी आणि योग्य विचारसरणी असेल, तर वेळ तुमच्या बाजूने काम करू शकतो.

Author

  • sajan bhuvad founder of marathi finance

    साजन भुवड हे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अभ्यासक आहेत. त्यांनी साडेचार वर्षे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत (Saraswat Bank) कर्ज, गुंतवणूक आणि ग्राहकांच्या वित्तीय सेवांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. सध्या ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) मध्ये 'रिलेशनशिप मॅनेजर' म्हणून कार्यरत आहेत. तिथे ते सर्वसामान्य तसेच HNI गुंतवणूकदारांना योग्य म्युच्युअल फंड निवडण्यात आणि पैशांचे योग्य नियोजन करण्यात मदत करतात.
    ते NISM आणि SEBI सारख्या सरकारी संस्थांकडून मान्यताप्राप्त (Certified) असून, त्यांनी खालील महत्त्वाच्या परीक्षा पास केल्या आहेत:

    NISM Series V-A: म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM Series V-B: म्युच्युअल फंड फाउंडेशन सर्टिफिकेशन

    NISM Series XXI-A: पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM: म्युच्युअल फंड ऑपरेशन्स मॉड्यूल

    SEBI: इन्व्हेस्टर सर्टिफिकेशन

    आपल्या याच अनुभवाच्या जोरावर साजन भुवड हे मराठी वाचकांसाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक बचतीबद्दल (Personal Finance) अगदी सोप्या आणि विश्वासाने समजेल अशा भाषेत लिहितात. सामान्य माणसाला पैशांचे योग्य निर्णय घेता यावेत, त्यांची आर्थिक साक्षरता वाढावी आणि भविष्यात चांगली संपत्ती तयार व्हावी, हेच त्यांचे ध्येय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top