देश स्वतंत्र झाला… पण तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहात का? ‘One SIP Strategy’ समजून घ्या!

आपण सगळ्यांनी नुकतच १५ ऑगस्ट… स्वातंत्र्यदिन एकदम भारी आणि उत्साहात साजरा केला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येकाच्या मनात आहेच. पण मित्रांनो, या उत्साहाच्या वातावरणात आज एका वेगळ्याच स्वातंत्र्याचा विचार करूया… तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचं काय?

देशाला परकीय गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं, पण आपण आर्थिकदृष्ट्या खरंच स्वतंत्र आहोत का? दर महिन्याला पगाराची वाट पाहावी लागू नये, अचानक आलेल्या खर्चामुळे आपली इन्व्हेस्टमेंट मोडावी लागू नये आणि भविष्यात ‘काम करायचं की नाही’ हा निर्णय पैशांवर अवलंबून राहू नये… हेच तर आर्थिक स्वातंत्र्याच खरं स्वप्न आहे!

पण तुम्हालाही माहितीये, ही जर्नी ऐकायला जेवढी सोपी वाटते, प्रॅक्टिकली तेवढीच कठीण आहे. कारण आयुष्यात खर्च कधीच थांबत नाहीत.

आर्थिक स्वातंत्र्याची जर्नी इतकी टफ का आहे?

खरं सांगू? ही जर्नी जाम टफ आहे बॉस! सुरुवात होते ती आपल्या पहिल्या जॉबपासून. पहिला पगार हातात पडतो, थोडी जबाबदारी जाणवू लागते आणि आपण ठरवतो— “आता मात्र पैसे इन्व्हेस्ट करायचेच!”

मग आपण उत्साहात एक चांगल्या म्यूचुअल फंडमध्ये SIP सुरू करतो. दर महिन्याला चुअल फंडमध्ये पैसे जाऊ लागतात. आपण स्वतःला एकदम शिस्तबद्ध (disciplined) इन्व्हेस्टर समजू लागतो. सगळं एकदम मजेत चालू असतं… आणि मग लाईफ गुगली टाकते!

पहिला धक्का: मेडिकल इमर्जन्सी

समजा, तुम्ही दोन वर्षांपासून मस्त SIP करत आहात. पण अचानक घरात काहीतरी मेडिकल इमर्जन्सी येते. हॉस्पिटलसाठी लगेच पैशांची गरज पडते आणि तुमचा Emergency Fund पुरेसा नसतो. मग आपण काय करतो? सरळ ती चालू SIP मोडून पैसे काढतो. संकट टळतं, पण तुमच्या इन्व्हेस्टमेंटला ब्रेक लागतो.

पुन्हा सुरुवात… आणि मग स्वतःचं घर

इमर्जन्सीमधून सावरल्यावर तुम्ही पुन्हा जिद्दीने सुरुवात करता. २-३ वर्षं सगळं व्यवस्थित जातं. मग विचार येतो— “लग्न करण्याआधी किंवा सेटल होण्याआधी आपलं स्वतःचं एक घर असावं.”

मग डाऊन पेमेंटसाठी पैसे जमवले जातात, लोन घेतलं जातं आणि सुरू होतो दर महिन्याचा EMI. आधी SIP साठी पैसे सहज उरत होते, पण आता EMI, मेंटेनन्स यामुळे बजेट टाईट होतं. मग सर्वात आधी कोणता खर्च कापला जातो? बरोबर… आपली SIP! “आत्ता EMI चालू आहे, SIP नंतर बघू,” असा विचार आपण करतो आणि हे ‘नंतर’ कधीच येत नाही.

घर झालं… आता लग्नाचा खर्च!

एकीकडे Home Loan चा EMI चालू असतो आणि त्यातच लग्नाचं वय होतं. लग्नाचा खर्च, कपडे, दागिने, ट्रॅव्हल… यासाठी पुन्हा मोठ्या पैशांची गरज भासते. मग आपण काय विचार करतो? “सध्या EMI चालू आहे, लग्नाला पैसे हवेत… जी उरलीसुरली SIP चालू आहे किंवा थोडे पैसे साठलेत, तेच काढूया!” आणि इन्व्हेस्टमेंट पुन्हा शून्यावर येते.

आणि मग येतात मुलं, शिक्षण आणि इतर खर्च…

घर झालं की मुलांचं प्लॅनिंग, त्यांचं शिक्षण, कधी गाडी घ्यायचीये, कधी घर रिनोव्हेट करायचंय. थोडक्यात काय? लाईफमध्ये खर्च कधीच संपत नाहीत. एक गोल पूर्ण झाला की दुसरा समोर उभा राहतोच. जर प्रत्येक वेळी आपण एकच SIP मोडून ती वापरत राहिलो, तर मग रिटायरमेंट किंवा फायनान्शिअल फ्रीडमसाठी पैसे कधी तयार होणार?

मग अशा वेळी नेमकं करायचं काय?

इथेच कामी येते माझी फेवरेट स्ट्रॅटेजी— ‘The One SIP Strategy’. तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या कामांसाठी अनेक SIPs असू शकतात. गाडीसाठी एक, घरासाठी एक, मुलांच्या शिक्षणासाठी एक. पण… यातली किमान एक SIP अशी ठेवा जी फक्त आणि फक्त तुमच्या ‘Financial Freedom‘ साठी असेल. तिला एक नाव द्या— “My Freedom SIP”

ही SIP कोणत्याही शॉर्ट-टर्म गोलसाठी नाही. मोबाईल घेण्यासाठी नाही, घराच्या रिनोव्हेशनसाठी नाही आणि लग्नासाठीही नाही. ही SIP फक्त तुमच्या भविष्यासाठी आणि अर्ली रिटायरमेंटसाठी आहे. बाकीचे गोल्स पूर्ण झाले की त्यांच्या SIP चे पैसे वापरा, पण या ‘Freedom SIP‘ ला चुकूनही हात लावायचा नाही!

पण जर खरोखरच पैसे कमी पडले तर?

हा एकदम प्रॅक्टिकल प्रश्न आहे. समजा इन्कम कमी झाली, खर्च वाढले किंवा अचानक पैसे लागले तर काय? अशा वेळी SIP पूर्ण बंद करणं हा एकमेव पर्याय नसतो. तुमच्या बजेटनुसार SIP ची अमाऊंट कमी करा. ₹१०,००० वरून ₹५,००० करा, किंवा ₹२,५०० करा. परिस्थितीनुसार अमाऊंट कमी-जास्त करा, पण इन्व्हेस्टमेंटची सवय मोडू नका.

मी आज कोणताही ठराविक SIP चा आकडा का सांगितला नाही?

या संपूर्ण आर्टिकलमध्ये मी तुम्हाला “₹५००० ची SIP करा” असं सांगितलेलं नाही. कारण प्रत्येकाचा पगार वेगळा आहे, खर्च वेगळे आहेत, लोन वेगळे आहेत. Personal Finance खरंच ‘Personal’ असतं. तुमच्या खिशाला जे परवडेल तिथून सुरुवात करा, पण सुरुवात नक्की करा.

या स्वातंत्र्यदिनाला एक वेगळा संकल्प करूया!

या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान नक्की बाळगा, पण स्वतःलाही एक छोटं प्रॉमिस करा: “माझ्या Financial Freedom साठी किमान एक SIP मी कायम चालू ठेवेन.” घर घेईन, लोन फेडेन, मुलांचं शिक्षण करेन. पण, माझ्या भविष्यासाठी असलेली एक SIP शेवटपर्यंत टिकवून ठेवेन. कारण आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतील, पण तुमच्या ‘आर्थिक स्वातंत्र्यासाठी’ पैसे तुम्हालाच तयार करावे लागतील!

Disclaimer: हा लेख केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता तपासा आणि आवश्यक असल्यास नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

Author

  • sajan bhuvad founder of marathi finance

    साजन भुवड हे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अभ्यासक आहेत. त्यांनी साडेचार वर्षे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत (Saraswat Bank) कर्ज, गुंतवणूक आणि ग्राहकांच्या वित्तीय सेवांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. सध्या ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) मध्ये 'रिलेशनशिप मॅनेजर' म्हणून कार्यरत आहेत. तिथे ते सर्वसामान्य तसेच HNI गुंतवणूकदारांना योग्य म्युच्युअल फंड निवडण्यात आणि पैशांचे योग्य नियोजन करण्यात मदत करतात.
    ते NISM आणि SEBI सारख्या सरकारी संस्थांकडून मान्यताप्राप्त (Certified) असून, त्यांनी खालील महत्त्वाच्या परीक्षा पास केल्या आहेत:

    NISM Series V-A: म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM Series V-B: म्युच्युअल फंड फाउंडेशन सर्टिफिकेशन

    NISM Series XXI-A: पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM: म्युच्युअल फंड ऑपरेशन्स मॉड्यूल

    SEBI: इन्व्हेस्टर सर्टिफिकेशन

    आपल्या याच अनुभवाच्या जोरावर साजन भुवड हे मराठी वाचकांसाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक बचतीबद्दल (Personal Finance) अगदी सोप्या आणि विश्वासाने समजेल अशा भाषेत लिहितात. सामान्य माणसाला पैशांचे योग्य निर्णय घेता यावेत, त्यांची आर्थिक साक्षरता वाढावी आणि भविष्यात चांगली संपत्ती तयार व्हावी, हेच त्यांचे ध्येय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top