SIP Investment Tips: आजकाल अनेक लोक SIP मध्ये पैसे गुंतवत आहेत. पण गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये नुकसान दिसत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, “SIP खरंच फायदेशीर आहे का?” विशेषतः ज्यांनी नुकतीच म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केली आहे, त्यांना सध्या रिटर्न कमी किंवा निगेटिव्ह (Negative) दिसत आहे. पण याचा अर्थ SIP चुकीचा पर्याय आहे असा होत नाही. उलट, SIP चा खरा फायदा लाँग टर्म गुंतवणूक केल्यावरच दिसून येतो.
WhiteOak Capital Mutual Fund च्या स्टडीनुसार SIP संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. जर तुम्ही पुरेसा वेळ बाजारात टिकून राहिलात, तर नुकसानाची शक्यता खूप कमी होते.
कमी कालावधीतील SIP मध्ये नुकसान का होऊ शकतं?
शेअर बाजार नेहमीच चढ-उतारांनी भरलेला असतो. काही वेळा बाजार वेगाने वाढतो तर काही वेळा मोठी घसरण होते. जर तुम्ही फक्त 3 ते 5 वर्षांसाठी SIP केली असेल, तर काही काळासाठी नुकसान दिसू शकतं. WhiteOak Capital Mutual Fund च्या स्टडीनुसार, 3 ते 5 वर्षांच्या SIP मध्ये सरासरी रिटर्न चांगला होता. पण सर्व गुंतवणूकदारांना प्रॉफिट मिळालाच असे नाही. म्हणजेच कमी कालावधीत बाजारातील घसरणीचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर होऊ शकतो. याच काळात अनेक लोक घाबरून SIP बंद करतात. पण SIP बंद करायचा निर्णय भविष्यातील मोठा फायदा गमावू शकतो.
SIP साठी योग्य कालावधी किती असावा?
WhiteOak Capital Mutual Fund च्या 8 वर्षांचा कालावधी SIP साठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण 8 वर्षांपेक्षा जास्त काळ SIP सुरू ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना ऐतिहासिकदृष्ट्या पॉझिटिव्ह रिटर्न मिळाला आहे. तर 10 वर्षांचा कालावधी अधिक मजबूत मानला जातो. कारण गेल्या जवळपास 30 वर्षांच्या आकडेवारीत 10 वर्षांच्या SIP ने प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह रिटर्न दिला आहे. याचा अर्थ असा की, बाजारात कितीही घसरण झाली तरी लाँग टर्म गुंतवणूक टिकवून ठेवणाऱ्यांना फायदा झालाच आहे.
जास्त वर्षे SIP केल्याने काय फायदा होतो?
10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ SIP सुरू ठेवल्यास नुकसानाची शक्यता खूपच कमी होते. तसेच चांगला रिटर्न मिळण्याची शक्यता वाढते. 12 ते 15 वर्षांच्या SIP मध्ये बहुतेक गुंतवणूकदारांना दहा टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न मिळाला होता. विशेष म्हणजे, 15 वर्षांच्या कालावधीत सर्वात वाईट परिस्थितीतही गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले नाहीत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, SIP मध्ये वेळ जितका जास्त तितकी सुरक्षितता अधिक वाढते.

रोलिंग रिटर्न (Rolling Return) म्हणजे काय?
म्युच्युअल फंडमध्ये अनेकदा CAGR रिटर्न दाखवला जातो. पण यात फक्त सुरुवात आणि शेवटचा कालावधी पाहिला जातो. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या वेळी गुंतवणूक सुरू करते. त्यामुळे सर्वांना सारखा अनुभव मिळत नाही. रोलिंग रिटर्न (Rolling Return) वेगवेगळ्या काळातील रिटर्न दाखवतो. त्यामुळे एखाद्या म्युच्युअल फंडने विविध परिस्थितीत कसा रिटर्न दिला हे अधिक स्पष्टपणे समजते.
बाजारातील घसरण SIP गुंतवणूकदारांसाठी संधी कशी ठरते?
जेव्हा बाजार खाली येतो, तेव्हा अनेक लोक घाबरतात. पण लाँग टर्म SIP करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. कारण बाजार घसरल्यावर तुमच्या महिन्याच्या SIP गुंतवणुकीत अधिक युनिट्स खरेदी होतात. त्यामुळे तुमची सरासरी खरेदी किंमत कमी होते. नंतर बाजार पुन्हा वाढल्यावर याच युनिट्समुळे मोठा फायदा मिळू शकतो.
योग्य म्युच्युअल फंड (Mutual Fund) निवडणेही महत्त्वाचे
फक्त SIP सुरू करणे पुरेसे नाही. योग्य म्युच्युअल फंड निवडणेही तितकेच आवश्यक आहे. जर चुकीच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली, तर लाँग टर्ममध्ये कमी रिटर्न मिळू शकतो. आणि वर्षे वाया जातील ते वेगळं. त्यामुळे कोणत्याही म्युच्युअल फंडचा जुना रिटर्न, खर्च आणि मॅनेजमेंट यांची माहिती तपासूनच गुंतवणूक करा.
निष्कर्ष
SIP ही पटकन श्रीमंत होण्याची योजना नाही. ही लाँग टर्म संपत्ती निर्माण करण्याची पद्धत आहे. कमी कालावधीत नुकसान दिसू शकतं, पण लाँग टर्म m गुंतवणूक टिकवून ठेवल्यास चांगला फायदा मिळण्याची शक्यता खूप खूप वाढते. जर तुम्हाला भविष्यासाठी मोठी आर्थिक बचत तयार करायची असेल, तर SIP किमान 10 वर्षे सुरू ठेवणे फायदेशीर ठरू शकते.